मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रोधन यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. आपल्या भाषणांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या चिठ्ठीच्या प्रकरणावरुन चांगलाच समाचार घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.
यात्रेदरम्यान सुषमा अंधारे यांनी, “काय काय बोलतील पत्ताच लागत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात असं कधी पाहिलं नाही. काय काय पाहायला मिळतंय आम्हाला आज. माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. मला वाईट वाटतं आहो. मला नाही चालत माझ्या भावाचा असा अपमान केलेलं. वाईट वाटतं मला. माझ्या भावाच्या समोरचा माईक ते काढून घेतात,” असे त्यांनी म्हटले. त्यांचं हे विधान ऐकून सभागृहामध्ये एकच हशा पिकला. “बोलायला लागले की कागद देतात. का माझ्या भावाला येत नाही काही? माझा भाऊ ढ वाटतो का तुम्हाला? माझा भाऊ कॉप्या करुन पास झालाय का?” असा उपहासात्मक प्रश्न अंधारे यांनी विचारला.
पुढे बोलताना त्यांनी, “हुशार आहे माझा भाऊ. विद्वान आहे माझा भाऊ. का कागद देताय तुम्ही त्यांना? का कॉप्या पुरवताय?” असा प्रश्न अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केला. “गिरीश महाजनांनी कागद वरुन करुन सांगायचं. हे अजिबात बरोबर नाही अध्यक्ष मोहोदय,हे आम्हाला पटलेलं नाही,” असे म्हणत अंधारे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली.