नवी दिल्ली : भारतीय चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लीना मणीमेकलाई यांच्या या माहितीपटामुळे देशभरात वादळ निर्माण झाले आहे. लीना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केले होते. कालीमातेचे हे पोस्टर समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर लोक निर्मात्या व दिग्दर्शक लीना मणीमेकलाई यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दरम्यान, अयोध्येतील एका महंतांनी लीना मणीमेकलाई यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
अयोध्येतील हनुमान गढी मंदिराचे महंत राजू दास यांनी लीना याचे शीर धडापासून वेगळे करण्याची धमकी दिली आहे. “नजीकच्या घटना बघा. जेव्हा नुपूर शर्माने योग्य गोष्ट सांगितल्यावर भारतभर, जगभर आग पेटली. पण तुम्हाला सनातन धर्माचा अपमान करायचा आहे का? तुम्हालाही तुमचे डोके तुमच्या शरीरापासून वेगळे करायचे आहे का? तुम्हाला हेच पाहिजे आहे का?” असे महंत राजू दास यांनी म्हटले आहे.
महंत राजू दास यांनी माहितीपटाच्या पोस्टरचा निषेध करत निर्मात्या लीना मणीमेकलाई या सनातन धर्म आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान आहे, असेही म्हटले आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला निर्मात्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली. या माहितीपटावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
“मी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करतो की तिच्यावर कठोर कारवाई करावी आणि माहितीपटावर बंदी घालावी. जर कारवाई केली नाही तर, आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू जी हाताळणे कठीण होईल. ”असे महंत दास म्हणाले.