विखेंना मंत्रिपद देऊ नका, या भाजप नेत्यांची मागणी

जिल्हा भाजपात विखे पिता-पुत्र एकाकी…?

अहमदनगर : जिल्ह्यात भाजपसह गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेला बारा विरुद्ध शुन्यचा नारा विधानसभा निवडणूक निकालानंतर फुसका ठरला असून, हा पराभव विखेंनीच घडवून आणला असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्या अनुषंगानेच भाजपचे पराभूत उमेदवार आणि नवनिर्वाचित आमदार शिवाजी कर्डीले आणि मोनिका राजळे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीत विखे यांच्यामुळेच जिल्ह्यात भाजपची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तसेच या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या  घडामोडींमुळे पिता-पुत्र एकाकी पडले असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पराभूत झालेले भाजपचे चार आमदार, राजळे आणि कर्डीले यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विखे यांनी केलेल्या राजकीय कुरघोड्याची माहिती दिली असल्याची माहिती समजते आहे.

निकालानंतर विखे यांचे राजकारण भाजप नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच विखे विरोधी भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी सर्व लेखाजोखा मांडला. विखे भाजपात आल्यानंतर त्यांनी त्यांना कोणी वरचढ ठरू नये, यासाठी भाजप उमेदवारांच्या पराभवासाठी राजकीय कुरघोड्या केल्या, असा आरोप मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सूत्रांकडून समजले.

दरम्यान विखे विरोधी शिष्ठ मंडळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असतानाच त्यानंतर विखे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. परंतु या विखे पिता पुत्रांसोबत इतर कोणीही भाजप पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे जिल्हा भाजपात विखे पिता-पुत्र एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.