नवी दिल्ली – केवायसीची फेरतपासणी करायची आहे, या नावाखाली काही अनाधिकृत संस्था बॅंक ग्राहकांकडून बॅंक खात्याचा तपशील मागत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॅंक ग्राहकांनी अशा संस्थापासून सावध राहावे. अनोळखी व्यक्ती किंवा संस्थांना आपल्या बॅंक खात्याची माहिती देऊ नये, अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने जारी केली आहे.
काही संस्था बॅंक ग्राहकाकडून केवायसी तपासणीच्या नावाखाली माहिती जमा करीत आहेत अशा तक्रारी आणि माहिती रिझर्व बॅंकेकडे उपलब्ध झाली आहे. गैरप्रकार करणारे फोन कॉल, एसएमएस, ई-मेलच्या माध्यमातून ग्राहकाकडून खात्याची माहिती, क्रेडिट कार्डची माहिती इत्यादी जमा करून त्यांचा दुरुपयोग करीत असतात.
त्यामुळे ग्राहकांनी सावध राहावे. काही संस्थांनी जर तुम्ही माहिती दिली नाही तर तुमचे खाते गोठवले जाईल किंवा बंद केले जाईल अशा धमक्या देत आहेत. अशी माहिती उपलब्ध केल्यानंतर तिचा दुरुपयोग केला जातो.
त्यामुळे अशा प्रकारची माहिती पूर्ण खात्री पटल्याशिवाय कुठल्याही संस्थेला देऊ नये. जर अशा प्रकारची माहिती मागणारे कोणी आले असेल तर त्याची माहिती आपल्या बॅंकांना आणि रिझर्व बॅंकेला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.