पुणे – सीओईपी मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्ण नाकारू नयेत. याठिकाणी काही कमतरता असतील, तर तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेश व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांनी रुग्णांना परस्पर जम्बो कोविड रुग्णालयामध्ये दाखल करू नये. महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर प्रवेश प्रक्रिया अधिक सुरळीत होईल, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून सीओईपीच्या मैदानावर जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. 600 ऑक्सिजन आणि 200 व्हेंटीलेटर्स बेड असलेल्या या हॉस्पिटलमध्ये बुधवारपासून (दि.2) रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, याठिकाणी रुग्ण दाखल करण्यासाठी कोणाकडे चौकशी करायची, रुग्णांकडे लक्ष दिले जात नाही, या माहितीपासून ते जेवण आणि अन्य सुविधांबाबत तक्रारी येण्याला सुरूवात झाली, अशातच काल दोन गंभीर रुग्णही दगावल्याने जम्बो कोविड हॉस्पीटलच्या व्यवस्थापनावर टीका होत आहे
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापन ज्यांच्याकडे दिली आहे त्या कंपनीचे अधिकारी, महापालिकेचे आरोग्य आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रुग्णालयातील सर्व कामे युद्धस्तरावर पूर्ण करण्याचे आदेश संबधित कंपनीच्या प्रतिनिधींना दिले आहेत.