हैदराबाद – तेलंगणमधील भद्राद्री-कोथागुडेम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये एक संशयित माओवादी मारला गेला. आज पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास गुंडाला मंडल इथे वाहनांची तपासणी सुरू असताना ही घटना घडली.
माओवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या भागातील टेहळणी वाढवण्यात आली होती. बुधवारी रात्री सशस्त्र माओवादी स्थानिक परिसरामध्ये मोटरसायकलवरून हिंडत असल्याचे समजले होते. या माहितीच्या आधारे परिसरामध्ये पोलिसांनी वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली होती.
पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी पोलिसांना मोटरसायकलवरील दोघे संशयित आढळले. त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या संशयितांनीही पळून जाण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक संशयित माओवादी ठार झाला, असे भद्राद्री-कोथगुंडेम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी सांगितले.
घटनास्थळी 25 वर्षीय माओवाद्याचा मृतदेह, एक शस्त्र आणि मोटरसायकल आढळून आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या वर्षी जुलैमध्ये कुमाराम भीम असिफाबाद आणि भद्राद्री-कोथागुडेम जिल्ह्यांमध्ये झलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये माओवाद्यांचे दोन सदस्य पळून जाण्यात यशस्वी झाले होते.