मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येशी निगडित अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाने या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आणखी एकाची चौकशी सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नसून राज्य अमली पदार्थ नियंत्रण विभगाने अटक केलेल्या बसित परिहारशी संबंधित त्याचा संबंध असल्याचे समजते आहे. ‘एनसीबी’ने याप्रकरणी आतापर्यंत बसित परिहार आणि झैद विलात्रा अशा दोघा जणांना अटक केली आहे.
झैद याला आज स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्याला 9 सप्टेंबरपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या जवळून 9,55,750 रुपये आणि विदेशी चलनही ताब्यात घेण्यात आले आहे. तो करत असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीचेच हे पैसे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला आहे.
‘एनसीबी’ने 27-28 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये अब्बास लखानी आणि करण अरोरा या आणखी दोघांना अमली पदार्थांच्या विक्रीच्या अन्य प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर झैद रडारवर आला होता. झैदकडून अमली पदार्थही ताब्यात घेतले गेले होते.