मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजप आमदार टी राजा यांचा कोल्हापुरातील प्रस्तावित कार्यक्रम रोखण्याचे साकडे घातले आहे. पवार साहेबांना सोडून तुम्ही प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातील पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे, असे माणून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नका ही आमची विनंती आहे, असे ते म्हणाले आहेत.
रोहित पुढे म्हणाले, कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली, परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आले आहे. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथले वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ
रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणाले की, दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असे मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती.