तळेगाव दाभाडे, दि. 11 (वार्ताहर) -सहा महिन्यांपूर्वीच माझा कौटुंबिक परदेश दौरा ठरलेला असताना पक्षीय कार्यक्रमातील माझ्या अनुपस्थितीचे भांडवल करून काहींनी गैरसमज पसरवून माझी राजकीय बदनामी केली आहे, असे स्पष्टीकरण देत, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दादालाही खासगी लाईफ आहे की नाही? दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही, असा थेट संतापजनक सवाल केला. उगाच काहीही उठवून बदनामी करायची, असं म्हणत गायब असणाऱ्या पवारांनी ती नाराजी नसुन बदनामी असल्याचे सांगत यामागचे गूढ अखेर स्वतःच समोर आणले.
तळेगाव जनरल हॉस्पिटल ऍण्ड कॉन्हवलसन्ट होम संस्थेच्या ऑनको-लाईफ कॅन्सर सेंटरच्या उद्घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.11) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, मायमर मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, संस्था अध्यक्ष गणेश खांडगे व उपाध्यक्ष चंद्रभान खळदे, गणेश काकडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रमेश साळवे, बापू भेगडे, कॅन्सर सेंटर प्रमुख उदय सरदेशमुख, डॉ. प्रताप राजेमहाडीक, डॉ. सत्यजित वाढोकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणातील ताज्या घडामोडी, सेवाभावी संस्थांचे कार्य, रस्ते अपघात, व्यसनाधिनता, मेडीसिटी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि कुप्रवृत्ती आदि विषयावर अजित पवार यांनी त्यांची परखड मते मांडली. पवार म्हणाले, की राजकीय मंडळींनी समाजाला कशाची गरज आहे, ते ओळखून त्या वाटेने जायला पाहिजे. सध्या सुरू असलेले भेदाभेद आणि जातीपातीचे विषय समाजाचे आरोग्य बिघडवणारे आहेत.