नव्या वर्षात सुरू होणार ः श्रीकांत बर्गे यांची माहिती
नारायणगाव – नारायणगाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेले अद्ययावत बसस्थानक सन 2023 या नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी वापरात येणार असल्याची माहिती बस स्थानकाचे ठेकेदार श्रीकांत बर्गे यांनी दिली.
नारायणगाव येथील जुन्या बस स्थानकातील प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन नव्याने बांधकाम केलेल्या बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अद्यावत रचना करण्यात आली आहे. बस स्थानकात दक्षिण व उत्तर बाजूने एकूण 12 प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आले असून, बस स्थानकाच्या दक्षिण बाजूने पुण्याकडे तर उत्तर बाजूने नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बसबसस्थानकात उभ्या राहणार आहेत.
बसस्थानकात पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह निर्माण करुन अंध व्यक्तींसाठी त्यांच्या भाषेत समजतील अशा प्रकारच्या टाईल्स बसविण्यात आल्या आहे. त्यामुळे बस स्थानकात प्रवेश करताना अंध व्यक्तीला कोणत्या दिशेला चालायचे व कुठे बसायचे, हे समजणार आहे. दिव्यांगांसाठी कमोड स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवास करणाऱ्या मातेस बाळाच्या स्तनपानासाठी ‘हिरकणी रूम’ बांधण्यात आली आहे. औषधे, एसटी कर्मचारी, व्यवसायिक व उपहारगृहासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी बसस्थानक नवीन वर्षात एसटी महामंडळाकडे हस्तांतरित केले जाणार आहे.