परभणी – गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ.प. ज्ञानोबा माऊली लटपटे यांचे गुरुवार (दि. 17) ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे शुक्रवारी (दि. 18) अंत्यसंस्कार होणार आहेत.
माऊली महाराज लटपटे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि मृदंग वादक होते. राज्यभरात त्यांचे शिष्य मंडळी आहेत. त्यांना लहानपणापासून भजन, कीर्तनाची आवड होती. तीर्थक्षेत्र आळंदी येथे त्यांनी अनेक वर्ष कीर्तन आणि मृदंगाचा अभ्यास केला. कीर्तनाच्या माध्यमातून आयुष्यभर समाजप्रबोधन केले. ते उत्कृष्ट मृदंग वादक होते. परळी येथे ते मृदंगाची शिकवणी घेत असत. त्यांच्या शिकवणीतून अनेक मृदंगवादक तयार झाले आहेत.
लटपटे महाराज यांनी अनेक वर्ष आळंदी येथील गीता भवनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.