परभणी: सगळीकडे दिवाळीचा सण साजरा होत असतानाच एन सणाच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील सोनपेठमध्ये शोककळा पसरली आहे. पाडव्याच्या दिवशी पहाटे सततच्या पावसाने घराची भिंत कोसळून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोनपेठ परिसरात एकच शोककळा पसारली आहे.
या घटनेत अरुण टेकाळे (४५) आणि मंदार टेकाळे (८) या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झालाय. तर कस्तुरबा टेकाळे(४०) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरम्यान मुळचे विटा ता.पाथरी येथील टेकाळे कुटुंब हे मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ शहरात राहत होते. मागील आठ दिवसांपासून महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास घरावरील माळवद व भिंत कोसळली यामध्ये अरुण टेकाळे व त्याचा मुलगा मंदार टेकाळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
त्यांच्या पत्नी कस्तुर टेकाळे या जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीसारख्या ऐन सणासुदीच्या दिवसांत अरुण टेकाळे आणि मंदार टेकाळे या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.