सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत जोकोवीच उपान्त्यफेरीत

सिनसिनाटी – येथे होत असलेल्या खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष गटांच्या सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचने लुकास पाओलीचा 7-6(7-2), 6-1 असा पराभव करत स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत प्रवेश केला. तर अन्य सामन्यात डॅनिएल मेदवेदने रॉजर फेडररला पराभूत करणाऱ्या अँड्रयु रुबलेवचा 6-2, 6-3 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली.

यावेळी झालेल्या पहिल्या सामन्यात जोकोविचसमोर लुकास पाओलीचे कडवे आव्हान होते. यावेळी लुकासने पहिल्या सेटमध्ये आत्मविश्‍वासाने खेळ केल्याने जोकोविचला पहिल्या सेटमध्ये कडवा प्रतिकार करावा लागला. यावेळी दोघेही सुरेख खेळ करत असल्याने सामना कधी जोकोविचच्या बाजूने झुकत असे तर कधी लुकासच्या बाजूने.

मात्र, जोकोविचने आपला सर्व अनुभव पणाला लावत लुकासवर 7-6 (7-2) अशा फरकाने विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. यावेळी पहिल्या सेट मध्ये आत्मविश्‍वासाने खेळ करणाऱ्या लुकासला दुसऱ्या सेटमध्ये आपले सातत्य कायम राखता न आल्याने त्याने दुसरा सेट 6-1 अशा फरकाने गमावला. त्याच बरोबर सामनाही गमवावा लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

तर, दुसऱ्या सामन्यात डॅनिएल मेदवेदसमोर अँड्रयु रुबलेवचे आव्हान होते. अँड्रयु रुबलेवने या सामन्यापूर्वी 16 वेळच्या ग्रॅण्डस्लॅम विजेत्या रॉजर फेडररचा पराभव केल्याने मेदवेदसमोर त्याचे कडवे आव्हान असणार अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, या सामन्यात रुबलेवला आपल्या लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. त्यामुळे मेदवेदने हा सामना एकतर्फी आपल्या नावे केला.

यावेळी मेदवेदने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून सामन्यावर वर्चस्व गाजवत दोन्ही सेट आपल्या नावे केले. पहिला सेट मेदवेदने 6-2 अशा फरकाने तर दुसरा सेट 6-3 अशा फरकाने जिंकत उपान्त्य फेरीत आपला प्रवेश निश्‍चित केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×