पुणे – पीएमपीएमएल प्रशासनाने आपल्या 9 हजार 511 कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात दिवाळीनिमित्त 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 19 हजार रु. बक्षीसाची रक्कम जमा केली आहे. पीएमपीच्या इतिहासात प्रथमच दिवाळीच्या चार दिवस आधी ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे, पीएमपी कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड झाली आहे.
कर्मचाऱ्यांकडून मागील काही दिवसांपासून 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 19 हजार बक्षीसाची रक्कम देण्याची मागणी केली होती. पण, निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. तर, व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावल्याने कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागरत करण्यात आले आहे. दरम्यान, पीएमपीच्या अध्यक्ष आणि संचालकपदाची जबाबदारी सांभाळताच बकोरीया यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याने कर्मचारी वर्गाकडून तसेच कामगारसंघाटनांकडून त्यांचे आभार मानन्यात आले.
“पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करत होतो. मात्र, संचालक पद रिक्त असल्याने याबाबत निर्णय होत नव्हता. त्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही विनंती केली होती. आज सकाळपासून महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली असून, तो प्रश्नही लवकरच मार्गी लागेल.”
– प्रमोदनाना भानगिरे, शहर प्रमुख ( बाळासाहेबांची शिवसेना )
असे आहे पीएमपीचे मनुष्यबळ –
चालक – 2 हजार 950
वाहक – 4 हजार 700
प्रशासकीय कर्मचारी – 1861