टीव्ही मार्केटमध्ये “दिवाळी’

पुणे – टीव्हीसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या छोट्या भागांच्या आयातीवरील शुल्क सरकारने कमी केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात टीव्ही काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्‍यता आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयाचे ग्राहक वस्तू व टिव्ही विक्रेत्यांनी स्वागत केले. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात एलसीडी आणि एलईडी टीव्हीसाठी लागणाऱ्या ओपन सेल पॅनलवरील आयात शुल्क 10 टक्‍के केले होते. आता ते शून्य टक्के करण्यात आले आहे. याबाबत बोलताना एका टीव्ही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मनीष शर्मा म्हणाले, “यामुळे टीव्हीचे देशात उत्पादन होण्यास चालना मिळणार आहे. यामुळे उत्पादन खर्च 3 टक्‍क्‍यांनी कमी होईल. मात्र, टीव्ही कंपन्या यातील किती भाग ग्राहकापर्यंत पोहोचवतात, हे पाहावे लागेल. मंदावलेली विक्री कमी करण्यासाठी कंपन्या दरात कपात करतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली.

विशेषत: वर्ल्डकप संपल्यानंतर टीव्हीच्या विक्रीत बरीच घट झाली होती. त्यामुळे टीव्हीच्या उत्पादकांनी सरकारकडे हे आयात शुल्क कमी करण्यासाठी तगादा लावला होता. मंदी कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना करीत आहे.

22 हजार कोटी रुपयांचा उद्योग
भारतातील टीव्ही उद्योग साधारणपणे 22 हजार कोटी रुपयांचा आहे. सरकारने आयात शुल्क वाढविल्यानंतर काही कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्रे व्हिएतनामकडे वळविण्याच्या या हालचाली सुरू केल्या होत्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×