पुणे – प्लॅस्टिक वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अशातच आयआयटी गुवाहाटी येथील संशोधकांनी आशेचा किरण दाखवला आहे. पर्यावरणपूरक प्लॅस्टिक निर्मितीसाठी बांबू वृक्षाचा उपयोग करण्याचा प्रयत्न या टीमने सुरू केला आहे. यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सदेखील स्थापन करण्यात आले आहे.
संस्थेमध्ये जैवविघटनशील प्लॅस्टिक उत्पादनाचा पहिला प्रायोगिक प्रकल्प नुकताच उभारण्यात आला. यात कंपोस्टेबल कटलरी, कॅरीबॅग, प्लॅस्टिक कंटेनर आणि चष्मा अशा बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक उत्पादनांसाठी प्लॅंटमध्ये अनेक प्रक्रिया येथे केल्या जात आहेत. या वस्तूंमध्ये फिल्म पॅकेजिंग लाइन, इंजेक्शन मोल्डिंग, कास्टशीट लाइन आणि थर्मोफॉर्मिंग उत्पादन लाइन्सचा उपयोग केला जातो.
त्याच्या उत्पादनांची प्राथमिक माहिती मिळवणे सध्या सुरू आहे. यातून देशभरातील उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन विकसित करण्यासाठी अधिक अभ्यास केला जात आहे. विशेषत: किंमत आणि कार्यक्षमतेत सध्याच्या प्लॅस्टिकच्या समतुल्य किंवा त्याहून उत्तम पर्याय विकसित करण्याच्या दृष्टीने या संशोधकांचे प्रयत्न आहेत.
“बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक आणि संबंधित उत्पादनसाठी मुख्य कच्चा माल म्हणून बांबूचा वापर करत आहोत. आम्ही कंपोस्टेबल प्लॅस्टिकशी संबंधित विविध तंत्रज्ञानावर काम केले आहे. हे तंत्रज्ञान अन्य उद्योगांसाठीही खुले आहे.” – प्रा. विमल कटियार, प्रमुख, संशोधन आणि विकास विभाग, आयआयटी गुवाहाटी