पिंपरी, दि. 22 – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन विकास आघाडीला हादरा बसला असून आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह कार्यकारणी सदस्यांनी नाना काटे यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. “वंचित’ ही भाजपाची “बी’ टीम बनली असून देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार करावे लागेल. त्यामुळे आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केल्याने निवडणुकीतील वातावरण आणखीनच तापले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत तायडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह चिंचवड विधानसभा निरीक्षक आणि आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रदेश युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मराठवाडा विकास संस्थेचे अरुण पवार, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रवेशावेळी बोलताना तायडे म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात देशातील वंचितांच्या शोषणाची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे वंचित घटकाच्या संरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला मदत करणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.
पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळे एकाही वंचिताचे मत दुसरीकडे जाणार नाही. पक्ष कोणासोबतही असला तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि आम्ही नाना काटे यांना एकगठ्ठा मतदान करू, असेही तायडे यावेळी म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी अभिषेक दांगट यांनीही नाना काटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
रिपब्लीकन सेनेचा महाविकास
आघाडीचे नाना काटे यांना पाठींबा
भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर देशात हुकूमशाही सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी भाजपाचा पराभवासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याने आम्ही चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले. रहाटणी येथे पत्रकार परिषद घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुकुंद रणदिवे, संजय गिरमे, युवराज बनसोडे, सुनील बनसोडे, संदीप रणदिवे, अजय गायकवाड, जयदेव रणदिवे, राजू गायकवाड, संदीप साळुंखे, सचिन सूर्यवंशी, विशाल बेनके, सर्जेराव वाघमारे, सुनील जयस्वाल यांच्याह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.