समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी तालुक्यात इच्छुकांची मांदियाळी पहायला मिळत आहे. इच्छुक नेतेमंडळींनी त्यादृष्टीने “मोर्चेबांधणी’ सुरू केली असून अधिकाधिक सेवा संस्थांचे ठराव मिळवण्यासाठी फिल्डींग लावली जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील राजकीय समीकरणे पुर्णतः बदलून गेली आहेत. जिल्हा बॅंकेसाठी नव्याने समीकरणे मांडली जाऊ शकतात.
विधानसभा निवडणुकीची धुरळा खाली बसण्यापुर्वीच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्यांदा नागवडे आणि कुकडी सहकारी कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर जिल्हा बॅंकेची निवडणूक. जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत मार्च 2020 मध्ये संपणार आहे. सध्या दत्तात्रय पानसरे हे जिल्हा बॅंकेच्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
नव्या वर्षाच्या मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक पानसरे यांच्यासह माजी आमदार राहुल जगताप, ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, सदाशिव पाचपुते, भगवानराव पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.
एरव्ही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे पाचपुते – नागवडे गट विधानसभा निवडणुकीत एकत्र आले आहेत. त्याचबरोबर जिल्हा बॅंकेआधी तालुक्यातील दोन्ही सहकारी कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची चिन्हे आहेत. या घटकांचा परिणाम जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवर पहायला मिळू शकतो. अन्यथा “नवी निवडणूक, नवे समीकरण’ हा श्रीगोंदा पॅटर्न देखील पहायला मिळू शकतो.
जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक पानसरे हे जिल्हा बॅंक निवडणुकीच्या नियोजनात आघाडीवर असून त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतल्यानंतर माजी आमदार राहुल जगताप हेही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती समजली.
गेल्या पाच वर्षात कुकडी कारखान्याला जिल्हा बॅंकेकडून कर्ज मिळवताना अडचणींचा सामना करावा लागल्याने स्वतः जगतापांनीच निवडणूकीत उतरण्याची जवळच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत काठावरचा पराभव बघावा लागल्यानंतर घनश्याम शेलार हे जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून राजकीय पुर्नवसनासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
पाचपुते गटातून जिल्हा बॅंकेसाठी सदाशिव पाचपुते आणि भगवानराव पाचपुते ही दोन नावे पुढे येत आहेत. त्याचबरोबर ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे मागील निवडणुकीत हुकलेली संधी यावेळी भरून काढण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांची नावे देखील चर्चिली जात आहेत. एकूणच, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील अर्धा डझनहून अधिक इच्छुकांनी कंबर कसली असून जास्तीत जास्त सेवा संस्थांचे ठराव आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या नावाने मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीपेक्षा जिल्हा बॅंकेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.