हैद्राबादच्या चार उच्चस्तरीय पथकांचे सलग अभ्यास दौरे
पुणे – मागील दोन वर्षांत पुणे स्मार्ट सिटीकडून औंध-बाणेर-बालेवाडी भागांत उभारण्यात आलेले प्रकल्प हैद्राबाद शहरासाठी रोल मॉडेल ठरणार आहेत. हैदराबाद (तेलंगणा) येथील 20 हून अधिक प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण चार पथकांनी नुकतेच पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांचे विशेष अभ्यास दौरे केले. हे प्रकल्प हैद्राबादमध्ये उभारण्यासाठी हैद्राबादच्या महापौरांनी पुढाकार घेतला आहे.
महापौर डॉ. बोन्तू राममोहन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना नोव्हेंबरमध्ये भेट दिली होती. या प्रकल्पांची दखल घेत त्यांनी प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी ग्रेटर हैद्राबाद महानगरपालिकेतील (जीएचएमसी) महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पुणे स्मार्ट सिटीचा अभ्यास दौरा करण्याच्या सूचना केल्या.
त्या अनुषंगाने डिसेंबरमध्ये आतापर्यंत हैद्राबाद महापालिकेतील विविध विभागांतील अधिकाऱ्यांची चार पथके पुणे दौऱ्यावर आली. “पीएससीडीसीएल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शिष्टमंडळांचे स्वागत केले आणि त्यांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अभ्यास भेटीदरम्यान तपशीलवार सादरीकरणाद्वारे त्यांना उपयुक्त माहिती दिली.
अभ्यास दौऱ्यात हैद्राबादच्या प्रतिनिधींनी विशेषत: सायन्स पार्क, कम्युनिटी फार्मिंग, एनर्जाईझ, रिन्यू अशा स्मार्ट प्लेस-मेकिंग साइट्स तसेच जपानीपद्धतीचे पु. ल. देशपांडे उद्यान, संभाजी उद्यान आणि मत्स्यालय, वाडिया महाविद्यालयाजवळील रमाबाई आंबेडकर उद्यानांना भेट दिली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटर, औंध आणि जंगली महाराज रस्ता येथील स्मार्ट स्ट्रीट रीडिझाईन, “ती’ शौचालय हे प्रकल्प पाहिले.
पुणे स्मार्ट सिटीने अनेक वापरात नसलेल्या छोट्या जागांचे रुपांतर उपयुक्त स्मार्ट ठिकाणांमध्ये केले आहे. हे प्रशंसनीय काम असून, या प्रकल्पांचा अभ्यास करून आमच्या यंत्रणेमार्फत हैद्राबादमध्ये असे प्रकल्प राबविण्याचा आमचा मानस आहे.
– बोन्तू राममोहन, महापौर, हैद्राबाद