परळी – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम सुरु आहेत. परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान होते. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महिलांना गिरणीचे वाटप करण्यात आले.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, यावेळी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक कराड, राष्ट्रवादी परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई तुपसागर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, नगरसेवक दिपक नाना देशमुख, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह आदी उपस्थित होते.