शिरवळ – खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये वडवाडी- हरतळी याठिकाणी शनिवारी दि. 15 फेब्रुवारी रोजी दूषित पाणीपुरवठ्यामुळे काही नागरिकांना जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने संबंधित नागरिकांनी शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.
मोठ्या प्रमाणात जुलाबाची साथ पसरल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून जुलाबाची साथ आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला असून स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून वडवाडी- हरतळी याठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्याठिकाणी साधारणपणे 35 रुग्ण आढळले.
आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने युद्धपातळीवर वडवाडी- हरतळी याठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी अस्वच्छ व त्यामध्ये साधारणपणे सहा इंचापर्यंत गाळ व गावामध्ये ठिकठिकाणी व्हॉल्व, पाईपलाईनमध्ये गळती झाल्याचे आढळून आले. काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नळालगत खड्डे घेतल्याने त्यामधूनही दूषित पाणीपुरवठा झाल्याचे उघडकीस आले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खड्डे, दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दुरुस्त करण्याची मोहीम सुरु केली आहे. शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, विंग आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वेक्षण करत जुलाबाची साथ आटोक्यात आणल्याचा दावा आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. शनिवारी दि. 15 फेब्रुवारीपासून दि. 19 फेब्रुवारीपर्यंत साधारणपणे 65 ते 70 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. वडवाडी- हरतळी येथील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे साधारणपणे 40 ठिकाणी नळालगतचे खड्डे मुजविण्यात आलेले नाहीत.
वडवाडी- हरतळी याठिकाणी जुलाबाची साथ निर्माण झाल्याची माहिती मिळताच खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. माधवी भोळे, ग्रामसेवक अशोक पवार यांनी वडवाडी- हरतळी येथे भेट देऊन पाहणी करत उपाययोजनांबाबत संबंधितांना सूचना केल्या.