ठाकरे-थोरात यांची चर्चा

राजस्थानातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे सावध

मुंबई – राजस्थानमधील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पवित्रा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसची चाचपणी केली. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची बैठक पार पडली.

शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात जवळपास तासभर बैठक झाली. मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

राजस्थानमध्ये कॉंग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये चाचपणी सुरु केली आहे. महाविकासाआघाडी सरकारला फटका बसू नये यासाठी कॉंग्रेसची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या. यानंतर आधी चर्चा-मग बदल्या असे सूत्र महाविकासआघाडीत ठरले आहे. त्यानुसार बदल्या करण्याआधी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजीचे मुद्दे मांडले होते.

यावेळी कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री विश्वासात घेत नाहीत. हवे असलेले प्रशासकीय अधिकारी मिळत नाही अशी मागणी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे लवकरच महसूल खात्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.