चाकण एमआयडीसीत अस्वस्थता

दत्तात्रय घुले

शिंदे वासुली – लॉकडाऊनला आता जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेल्याने चाकण औद्योगवसाहतीत अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्यातील एक मोठी एमआयडीसी म्हणून नावलौकीक असलेल्या चाकण एमआयडीसीत केवळ 14 अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या वगळता इतरांचे कामकाज ठप्प असल्याने कामगारांच्या रोजीरोटीचा आणि अनेक ठिकाणी कंपनीच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

चाकण एमआयडीसीत 32 मोठ्या कंपनी असून वार्षिक हजारो कोटी रुपयांची उलाढाल येथे होते. तर कंपन्यांमध्ये हजारो कामगार काम करतात. काही अटी व शर्तींवर कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी कंपन्यांमधील प्रमुख अधिकारी वर्ग हा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राहत असून ही दोन्हीही शहरे रेड झोनमध्ये असल्याने या अधिकाऱ्यांना सध्या तरी कंपन्यांमध्ये येणे शक्य होणार नाही. तर असंख्य कामगारही गावी परतले असल्याने कामगारही उपलब्ध होणार नाही. त्यामुळे कंपन्या सुरू केल्या तरी अधिकारी व कमगारांची कमतरता भासणार हे नक्की. तर करोनाच्य पार्श्वभूमीवर स्थानिकही कंपन्या सुरू करण्याच्या विरोधात असल्याने कंपन्या सुरू होणार की नाही हा प्रश्न सध्या तरी अनुपस्थितीत आहे. उद्योग व्यवसाय लवकर सुरु झाले नाही तर औद्योगिक अर्थकारणाचे कंबरडे मोडेल, अशी भीती व्यक्त होत आहे. कामगारांच्या हाताला तातडीने काम मिळणे आवश्यक आहे, तसेच लघुद्योजकांनाही शासकीय स्तरावर मदत दिली गेली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय 32 कंपन्या

चाकण एमआयडीसीत मोठ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय 32 कंपन्या आहेत. तर छोट्या 665 कंपन्या असून यातील अत्यावश्यक सेवेतील 14 कंपन्या सुरू आहेत. तरह तर बिरदवडीतील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ लि. (डब्लूएमडीसी) अंतर्गत 100 पेक्षा अधिक कंपन्या तसेच चाकण, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी, आंबेठाण येथील चाकण इंडस्ट्रीयल असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या 650 खासगी कंपन्या पूर्णपणे बंद आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.