मुंबई : अनुशासन हीच यशस्वी मानवी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सर्व क्षेत्रातील प्रगती साधण्यासाठी स्काऊट गाईडचे योगदान महत्त्वाचे आहे. स्काऊट गाईड, एनसीसी व क्रीडा यामध्ये शिस्त, शारीरिक स्वास्थ्य व मेहनत या बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरावर या तिन्ही माध्यमातून वार्षिक कार्यक्रम घेण्यासाठी विभाग पुढाकार घेईल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार प्रमाणपत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड पॅव्हेलीयन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री केदार पुढे म्हणाले की, स्काऊट गाईडच्या माध्यमातून घेण्यात येत असलेले कॅम्प अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्यात स्काऊट गाईडची चळवळ मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी सर्व शाळांमध्ये स्काऊट गाईड सुरु करून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शकांचे त्यांनी अभिनंदन केले.
पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करावी – राज्यपाल कोश्यारी
स्काऊट गाईडमध्ये काम करताना प्रमाणपत्र अथवा पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करावी. समाजसेवा केल्यानंतरचे जे आशीर्वाद मिळतात ते पुरस्कारापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. या पुरस्काराने सर्वांना प्रोत्साहन मिळेल. आज तुम्ही राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, यापेक्षा अधिक चांगले काम केल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकाराल अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.