वॉशिंग्टन -अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तान भेट टाळण्याची सूचना केली आहे. त्यासाठी पाकिस्तानातील करोना संकट आणि दहशतवाद्याच्या धोक्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकी परराष्ट्र खात्याने बुधवारी आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनेमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.
जगातील अनेक देशांप्रमाणे पाकिस्तानला करोना फैलावाने ग्रासले आहे. मात्र, ते संकट आटोक्यात आणण्यासाठी पाकिस्तानकडे प्रभावी आरोग्य यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातील त्या विदारक स्थितीवर अमेरिकेने बोट ठेवल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानच्या अनेक भागांत दहशतवादी कारवाया आणि अपहरणासारख्या गुन्ह्यांचा धोका असल्याकडेही अमेरिकेने लक्ष वेधले आहे. पाकिस्तानात हल्ले घडवण्याचे कट दहशतवादी संघटनांकडून रचले जात आहेत.
त्यामुळे त्या देशातील महत्वाची ठिकाणे दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरू शकतात, असा सावधगिरीचा इशारा अमेरिकी प्रशासनाने दिला आहे. मागील काही काळापासून अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. अशात अमेरिकेने नागरिकांना दिलेल्या सूचनेमुळे पाकिस्तानच्या अस्वस्थतेत भर पडण्याची शक्यता आहे.