शिक्रापूर- लॉकआउट आणि सर्व हॉटेल व खाद्यपदार्थ दुकाने बंद असल्यामुळे अनेक भागांमध्ये कामगार, बाहेर गावातून नोकरी निमित्ताने राहत असलेली मुले, मजूर यांसह आदींवर उपासमारीची वेळ आलेली असल्याने अशा गरजूंना पोटभर अन्न मिळण्यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पुढकार घेतला आहे. शिक्रापूर येथील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे जनक सुरेश भुजबळ यांच्या सहकार्याने परिसरातील गरजूंना मोफत घरपोच जेवणाचे डबे देण्याची सुविधा सुरू केली आहे.
सुरेश भुजबळ व श्रीनाथ केटरर्सचे संचालक पांडुरंग राऊत यांच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांना मोफत पोटभर अन्न सेवा सुरु करण्यात येत आहे, यामाध्यमातून दररोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत जेवण पुरविण्यात येत आहे. एका व्यक्तिसाठी पूरेल अशा जेवणाचे पार्सल डबे तयार करुन ते गरजवंत आणि भुकेलेल्यांच्या थेट हातात दिले जाणार आहे. या सुविधेसाठी जेवण पार्सल देण्याचे चार वितरण पॉईंट निवडले असून ज्यांना जेवण हवे त्यांनी भाऊ राऊत यांच्याशी 9637126526 या क्रमांकावर तसेच शिवाजी आहिरे यांच्याशी 9168380204 या क्रमांकावर संपर्क करून जेवण बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दररोज बुकिंग करणाऱ्या नागरिकांना पुढील निर्णय होईपर्यंत आणि गरजूंची जेवणाची सोय होईपर्यंत जेवण पुरविले जाणार असल्याचे सुरेश भुजबळ यांनी सांगितले असून नागरिकांनी दररोज सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत फोन करून जेवण बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- मोफत जेवण पुरविण्याची ठिकाणे व वेळ
भाऊसाहेब खरपुडे यांच्या घरासमोर, मलठण फाटा (सायंकाळी 6.15) स्टेट बॅंकेसमोर, पाबळ चौक (सायंकाळी 6. 45) चव्हाण कॉम्प्लेक्स समोर, तळेगाव रोड (सायंकाळी 7.15) अमृतवेल स्कूल समोर शिक्रापूर चाकण चौक (रात्री 7.45).