दहा हजार मीटरची खरेदी : 20 कोटींचे मीटर 100 कोटींना खरेदी केल्याचा आरोप
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आता नवा घोटाळा उजेडात आला असून आवश्यकता नसतानाही डिजिटल मीटरच्या नावाखाली तब्बल शंभर कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे 20 कोटी रुपयांचे मीटर शंभर कोटींना खरेदी करून 80 कोटींचा चुना लावण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत कलह, भ्रष्टाचार, टक्केवारी, शेकडो कोटींची उधळपट्टी या प्रकारामुळे सातत्याने चर्चेत असतानाच आता “स्मार्ट सिटी’ प्रकल्पातही याच भ्रष्टाचाराची आणि मनमानीची लागण झाली आहे. “स्मार्ट सिटी’ अंतर्गत सध्या 1300 कोटींहून अधिक रुपयांच्या निविदा प्रक्रिया मंजूर करण्यात आल्या असून त्यातील बहुतांश कामे सुरू आहेत. पाणी पुरवठा, नळांचे मीटर या प्रकाराची तत्सम कामे महापालिकेकडून सुरू आहेत. 24 तास पाणीपुरवठ्यासाठी सध्या आठशे कोटी रुपयांची कामे अमृत योजनंतर्गत महापालिका हद्दीत सुरू आहेत. या योजने अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून नवे पाणीमीटर बसविण्यात येणार आहेत.
मात्र, स्मार्ट सिटीशी पाणी मीटरचा विषय निगडीत नसतानाही एका ठेकेदाराला पोसण्यासाठी डिजिटल मीटरच्या नावाखाली तब्बल शंभर कोटी रुपयांच्या आसपास उधळपट्टी करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अमृत योजने अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने खरेदी केलेल्या मीटरच्या जागी आता हे मीटर बसविण्यात येणार आहेत.
शहरातील एकाही लोकप्रतिनिधी अथवा नागरिकाची मागणी नसताना अधिकारी आणि स्मार्ट सिटीच्या पदाधिकाऱ्यांना पोसण्यासाठी 80 कोटींचा मलिदा ठेकेदाराच्या घशात घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या मीटर खरेदीची तक्रार राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या विषयात अजित पवार यांनी लक्ष घातल्याचेही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ सत्ताधारी आणि ठेकेदारांना पोसण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी केला आहे.
एसीबी चौकशी होणार – शितोळे
स्मार्ट सिटी अंतर्गत शेकडो कोटी रुपयांची खरेदी ही संशयाच्या भोवऱ्यात असून आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पुराव्यासह हा घोटाळा मांडला आहे. याबाबत अजित पवार यांनी एसीबी मार्फत चौकशी करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून त्यांच्या पातळीवरही या प्रकरणातील तथ्याबाबत चौकशी केली जात आहे. लवकरच मीटर खरेदीसह इतरही अनेक बाबींची चौकशी एसीबीमार्फत केली जाणार असल्याचेही शितोळे म्हणाले.
अद्यापर्यंत तक्रार नाही – पोमण
स्मार्ट सिटी अंतर्गत जी खरेदी करण्यात आली आहे, ती नियमानुसार असून सर्वात कमी दर अदा करणाऱ्या व्यक्तीला काम देण्यात आले आहे. प्रशांत शितोळे अथवा इतर कोणी तक्रार केल्याचे आमच्या निदर्शनास आले नसल्याची प्रतिक्रिया, स्मार्ट सिटीचे नीलकंठ पोमण यांनी दिली.