नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सात देशांच्या राजदूतांचे ओळखपत्र व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रपती भवनच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने ओळखपत्र स्वीकारण्यात आले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनाच्या इतिहासात प्रथमच अधिकारपत्रे डिजिटल माध्यमातून सादर करण्यात आली. ज्या देशांच्या राजदूतांचे ओळखपत्र स्वीकारण्यात आले आहे त्यात डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरियाचे राजदूत चोई हू चोल, सेनेगलचे राजदूत अब्दुल वहाब हैदरा, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे उच्चायुक्त रोजर गोपॉल, मॉरिशसचे उच्चायुक्त शांतीबाई हनुमानजी, ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी रॉबर्ट ओफारेल, कोटे डेलवेअरचे राजदूत एम. इरिक कॅमिले आणि रवांडाचे उच्चायुक्त जॅकलीन मुकांगिरा यांचा समावेश आहे.
रामनाथ कोविंद म्हणाले, कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानावर मात करणे डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य होत असून कामे कल्पक पद्धतीने करणेही शक्य होत आहे. अधिकारपत्रे सादर करण्याचा हा डिजिटल कार्यक्रम म्हणजे राजनैतिक समुदायासमवेत भारताच्या असलेल्या संबंधात विशेष दिवस आहे, असे ते म्हणाले. भारतीय जनतेच्या आणि जगाच्या प्रगतीसाठी डिजिटल मार्गाच्या अमर्याद शक्यता आजमावण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड-19 महामारीमुळे जागतिक समुदायासमोर अभूतपूर्व आव्हान निर्माण झाले असून या संकटाने अधिक जागतिक सहकार्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे राष्ट्रपतींनी या राजनैतिक अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. या महामारी विरोधातल्या लढ्यात सहकारी राष्ट्रांना मदतीचा हात पुढे करण्यात भारत आघाडीवर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.