अहमदाबाद – गेल्या वर्षीपासून देशात सुरू झालेल्या करोना संसर्गामुळे हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. मात्र आरोग्य क्षेत्रातील लोकांनी आपला जीव धोक्यात घालून करोना रुग्णांची सेवा केली. त्याचवेळी करोनामुळे देशातील सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, सांस्कृतीक घटकांवर मोठा परिणाम झाला. अनेकांची वाताहत झाली असून काहींचे संसार मोडलो. तर डिप्रेशनमध्ये अनेकांनी आत्महत्या केल्या. अशीच काहीशी घटना आता गुजरातमधून समोर आली आहे.
अहमदाबादच्या इसनपूर भागात एका नर्सला रुग्णसेवा करताना करोनाची लागण झाल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला घराबाहेर काढलं. आता तिच्या कुटुंबातील सदस्य तिला पुन्हा घरात घेऊ इच्छितात. मात्र यासाठी त्यांनी तिच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. यामुळे करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सवरच वाईट दिवसं आल्याचं चित्र आहे.
27 वर्षीय नर्सने याबाबत खोखरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिनं म्हटलयं की, खोखरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी 2020 मध्ये माझा विवाह झाला. मी मणिनगर येथील एलजी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होते. मात्र एप्रिल 2020 मध्ये करोनाचा संसर्ग झाल्यानंतर मला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढलं. आता परत सासरी यायचं असेल तर 10 लाख रुपये सोबत घेऊन ये, अन्यथा घटस्फोट असं सासरच्या लोकांनी म्हटल्याचं पीडितेच म्हणण आहे.
दरम्यान मागील सहा महिन्यांपासून आपण माहेरी राहात असून आता तर पती भेटायला देखील येत नसल्याची तक्रार महिलेने केली आहे.