नियामे (निगेर), दि. 22 – आफ्रिकेतील निगेर देशाच्या नैऋत्येकडील एका गावात सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान 22 जण ठार झाले. थलाबेरी भागातील तीन गावांमध्ये हल्लेखोरांनी हल्ला केला. ही गावे माली आणि बुर्किना फासो या देशांच्या सीमांना लागून आहेत.
हा हल्ला इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केला असल्याचे संरक्षणाशी संबंधित सूत्रांनी म्हटले आहे. आठवडाभरापूर्वीच याच भागात कट्टरवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये तब्बल 58 जण ठार झाले होते, तर 2 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी दोन गावांवर अशाच प्रकारे हल्ले करून 100 जणांना ठार केले होते.
या भागामध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी पूर्वीदेखील अशाप्रकारचे भीषण हल्ले केले आहेत. त्यामध्ये सर्वसमान्य नागरिकांबरोबर सुरक्षारक्षकही मोठ्या संख्येने मारले गेले आहेत. पश्चिम आफ्रिकेतील साहेल भागात अल कायदाशी संबंधित दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर होत असतात.