नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडीओ आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा. तसे राहुल गांधी यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण या व्हिडीओला एक भावनिक किनार लागल्याचे सांगण्यात येत आहे. केरळ काँग्रेसने एक भावनिक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला राहुल गांधींना आपला मुलगा म्हणत आहे आणि त्यांच्या हातात मिठाई देताना दिसत आहे.
“राहुल गांधींचा मतदार संघ असलेल्या वायनाडमधला हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी आपला मतदार संघ असलेल्या केरळमधील वायनाड इथे दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना ही महिला भेटली. तिने राहुल गांधींना भेटताना त्यांच्या सुरक्षारक्षकांना सांगितले की राहुल गांधी तिला मुलासारखे आहेत. त्यांचा जन्म झाला तेव्हा सर्वात आधी या महिलेनेच त्यांना पाहिले होते असेही ती म्हणाली.
The wholesome love and affection from Rajamma Amma who was a nurse at Delhi’s holy family hospital where
Shri @RahulGandhi was born. pic.twitter.com/fMCDNIsUio— Congress Kerala (@INCKerala) August 17, 2021
या महिलेचे नाव आहे राजम्मा अम्मा. १९ जून १९७० रोजी दिल्लीच्या ज्या होली फॅमिली रुग्णालयात राहुल गांधींचा जन्म झाला, त्याच रुग्णालयात त्या नर्स म्हणून काम करत होत्या. राहुल यांच्या जन्मावेळी त्या तिथेच होत्या. राहुल गांधींची काळजी राजम्मा यांनीच घेतली होती. त्यामुळेच त्यांनी हक्काने सांगितले की हा माझा मुलगा आहे. याचा जन्म माझ्यासमोरच झाला आहे.
या राजम्मांनी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबद्दलही चौकशी केली आणि त्यांना आशिर्वाद दिले. राहुल गांधी तिथून जात असताना राजम्मा यांनी राहुल यांच्या हातात खाऊचा पुडाही ठेवला.राहुल गांधी हे याआधी २०१९ साली राजम्मा यांना भेटले होते. वायनाड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर ही भेट झाली होती.