मलठण, (वार्ताहर)- खानवटे (ता. दौंड) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लता दीपक ढवळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रमोद नामदेव लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खानवटे सोसायटीच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलेची सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक, सभासद व ग्रामस्थांच्या वतीने विशेष अभिनंदन होत आहे.
चेअरमन हनुमंत पवार व व्हाईस चेअरमन सोमनाथ पोटफोडे यांनी निर्धारित कार्यकाल पूर्ण केल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त होती. रिक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी सोसायटीची संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती.
यावेळी अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी लता ढवळे यांचा तर व्हाईस चेअरमनपदी प्रमोद लोखंडे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे ढवळे यांची चेअरमन तर लोखंडे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी अण्णासाहेब राजेभोसले, मच्छिंद्र पोटफोडे, अशोक गायकवाड, हनुमंत पवार, विजयसिंह राजेभोसले, किशोर माहुरकर, भीमराव पवार, बापूराव थोरात, दीपक ढवळे, अंकुश माहुरकर, रामचंद्र कन्हेरकर, विलास ढवळे, रंगनाथ ढवळे, शंकर ढवळे, दादा लोखंडे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश शितोळे यांनी काम पाहिले.
बैठकीचे संयोजन संस्थेचे सचिव रमेश शिंदे यांनी केले. निवडीनंतर सभासदांच्या वतीने नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक मंडळाने विश्वास दाखवून संस्थेच्या प्रथम महिला चेअरमन होण्याचा मान मला दिला आहे.
सर्व संचालक मंडळ व सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार पारदर्शीपणे करण्याचा तसेच सभासदांना अधिकाधिक लाभांश मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नुतन चेअरमन ढवळे यांनी निवडीनंतर सांगितले.