Madhuri Dixit| तेजाबची मोहिनी, देवदासची चंद्रमुखी, हम आपके है कौनची निशा, माधुरी दीक्षितच्या अशा असंख्य भूमिका प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतात. बॉलिवूडच्या याच डान्सिंग क्वीनचा आज वाढदिवस आहे. १९८४मध्ये अबोध चित्रपटातून माधुरीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती १९८८च्या तेजाबमुळे… या चित्रपटातील प्रेक्षकांच्या मनावर घातलेली ‘मोहिनी’ आजही कायम आहे. तिच्या या भूमिकेचं फार कौतुक झालं. त्या वर्षीच्या फिल्मफेयर पुरस्कारांसाठी माधुरीला नामांकन देखील मिळालं होत. ‘अबोध’नंतरची चार वर्ष बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी गेली मात्र त्यानंतर माधुरीने कधी मागे वळून पाहिलंच नाही. ‘दिल’, ‘बेटा’, हम ‘आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’ असे एकामागून एक सुपर डुपर हिट चित्रपट माधुरीने दिले. बेटा चित्रपटातील भूमिकेसाठी तिला पहिला फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला. माधुरीला बॉलिवूडची डान्सिंग डीव्हा म्हणून ओळखलं जातं. ‘एक दो तीन’, ‘धक धक करणे लगा’, ‘चोली के पीछे क्या है’ गाणी माधुरीच्या नृत्याने अजरामर केली. एका महाराष्ट्रीयन कुटुंबात वाढलेल्या माधुरीने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कथ्थकचे धडे गिरवले आहेत. प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज हे तिचे गुरु. सरोज खान यांनी केली पारख माधुरीचं तेजाब चित्रपटातलं एक दो तीन हे गाणं प्रचंड गाजलं. मात्र मुळात हे गाणं माधुरीवर चित्रित करण्यातच येणार नव्हतं. माधुरीतील नृत्याचे गुण कोरिओग्राफर सरोज खान यांनी ओळखले. त्यांनीच हे गाणं माधुरीवरच चित्रित होईल अशी ठाम भूमिका घेतलेली. यानंतरच माधुरीला या गाण्यामध्ये संधी मिळालेली. लग्नानंतर ब्रेक अन् पुनरागमन माधुरीने १९९९मध्ये लगीन गाठ बांधली. परदेशस्थित डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्नानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेत परिवाराला प्राधान्य दिलं. तिच्या या निर्णयावर तेव्हा बरीच चर्चा देखील झाली. २००७मध्ये तिने आजा नचले या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. सध्या ती अनेक रिऍलिटी शो, अवॉर्ड फंक्शनमध्ये झळकते.