बारामती – धनगर समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी भाजप कार्यशील असून मतांचे कर्ज व्याजासहित परत करणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अभी काका देवकाते मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचे आयोजन बारामती येथे करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते.
कार्यक्रमास माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळकर, चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक,उज्वला हाके, प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, मच्छिंद्र टिंगरे,दिलीप खैरे, अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, नितीन मदने, राहुल कोळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, “समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. रोजगारभिमुख शिक्षण गरजेचे आहे. शेळी मेंढी महेश महामंडळासाठी दहा हजार कोटींची तरतूद सरकारची आहे. धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हजारो युवकांना याचा लाभ घेता येणार आहे. धनगर व इतर समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
कार्यक्रमात बोलताना मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. 32 वर्षात शारदा प्रांगणात अहिल्यादेवी जयंतीच्या उत्सवात शरद पवार कधीही उपस्थित राहिले नाहीत. कुटुंबाच्या बाहेर पवार यांचे राजकारण नाही. त्यांना एक हाती सत्ता कधी आणता आली नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात येताच स्वार्थापोटी जनतेच्या दारात जाण्याचा प्रयत्न आहे. याआधी कधीच नाही पण यंदा सुप्रिया सुळे यांनी पालखीत भाकरी थापल्या. पण जनता हुशार आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. विजय शिवतरे यांनी देखील राष्ट्रवादीचा समाचार घेतला पवार यांनी स्वतः कोणत्याही संस्था निर्माण केल्या नाहीत घुसखोरी मात्र केली असा टोला शिवतरे यांनी लगावला.
नामकरणाचा शासकीय कार्यक्रम होणार
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आसे नामकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नामकरणाचा शासकीय कार्यक्रम घेण्यात येईल. येत्या एक ते दोन महिन्याच्या आत बारामतीत हा दिमागदार सोहळा पार पडेल असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
३०० व्या जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती साजरी होत आहे. अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंतीस पंतप्रधान नरेंद्र उपस्थितीत राहतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह यांच्यासह अन्य नित्य मंडळींना घेऊन प्रयत्न करणारा असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
नेटके आयोजन व कौतुकाची थाप
सालाबाद प्रमाणे अभीकाका देवकाते, नितीन मदने, राहुल कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जयंतीचे नेटके आयोजन केले होते. जयंती समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहरातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीतील समाज बांधवांचा उत्साह पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिकाका देवकाते यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेतली. हजारो युवकांना तुमच्या माध्यमातून रोजगाराच्या वाटा निर्माण करून देऊ असे आश्वासन यावेळी अभीकाका देवकाते यांना दिले.