धनंजय महाडिकांच्या भाजप प्रवेशाचा 31 ऑगस्ट चा मुहूर्त ?
कोल्हापूर: राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये जाणार असणाऱ्या शक्यतेला आता मूर्त रूप मिळत असल्याचे दिसते आहे. कारण त्यांनी गुप्तपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून येत्या 31 ऑगस्ट रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे देखील सूत्रांनी सांगितले आहे.
धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. मात्र पक्षांतर्गत झालेल्या गटबाजीमुळे त्यांचे पक्षातीलच काही नेत्यांनी काम केले नाही. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्धार केला. तसेच त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक भाजपचे विद्यमान विधानसभा आमदार आहेत. तर अमल महाडिक यांच्या पत्नी शोमिका महाडीक या देखील भाजपकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे एक कुटुंब एक पक्ष संकल्पना साकार होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना भाजपमध्ये राज्यस्तरावरील मोठे पद दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यांना नेमके कोणते पद दिले जाणार याबद्दल देखील उत्सुकता आहे. तर धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगलेच खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण येथे राष्ट्रवादीला तगडा मराठा नेताच उरणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी भविष्यात हि पडलेली बाजू कशी सावरते ते देखील बघण्यासारखे राहणार आहे.