देवेंद्र फडणवीस…दिलखुलास, प्रगल्भ आणि धोरणी नेता

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस. देवेंद्रजींनी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. यातील तब्बल 28 वर्षे त्यांनी राजकारणात काढले आहेत. 1992 साली वयाच्या 21 व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळेस नागपूरला ते कायद्याचे शिक्षण घेत होते. शेवटच्या वर्षाला होते. इतक्‍या लहान वयात नगरसेवक होणे, हा एक तेव्हाचा रेकॉर्ड होता. पण, आयुष्यात इतक्‍या लवकर संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी राजकारणात सोने केले.

देवेंद्रजींची अभ्यासू वृत्ती यावेळेस खूप कामात आली. मी एकदा त्यांना विचारले, की त्यांनी महानगरपालिकेचे काम कसे समजून घेतले? त्या वेळेस त्यांनी जे सांगितले ते खूप मार्मिक होते.
“सहसा एखादा माणूस नगरसेवक झाला, की ठेकेदारच त्यांना ताब्यात घेतात व कुठली कामे करायची हे सांगतात. पण, मी असे केले नाही,’ असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “मला माझ्या वॉर्डमध्ये ग्राउंडला तारेचे कुंपण घालण्याचे काम होते. मी स्वतः फाइल तयार केली आणि महानगरपालिकेमध्ये फाइल कशी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाते हे मी प्रत्यक्ष पहिले. स्वतः प्रत्येक टेबलवर ती फाइल मी फिरवली. बजेट कसे मिळते, ते समजून घेतले. त्यामुळे मला कामात कुठलीच अडचण गेली नाही.’

राजकारणचे बाळकडू फार लहानपणापासूनच त्यांना मिळाले. त्यांचे वडील आणि माझे काका गंगाधरराव फडणवीस हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून दहा वर्षे आमदार होते. आमच्या काकू शोभाताई फडणवीस या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल सावली मतदारसंघातून 1990 पासून आमदार होत्या. यामुळे राजकारण जवळून बघता आले. तसेच माझे वडील बाळासाहेब फडणवीस भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष होते. त्यामुळे सामाजिक जाणीवेचे भान फार लहानपणी त्यांना मिळाले. त्याकाळी जनसंघ व भाजपची घरे कमी असल्यामुळे मा. अटलजी, मा. अडवाणीजी, प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, नितीनजी गडकरी यांचा वावर घरी कायम असायचा. त्याचाही एक वेगळा पगडा देवेंद्र यांच्यावर पडला होता. या सगळ्यामुळे त्यांची एक वक्तृत्वाची शैली निर्माण झाली. कधी अटलजींची नक्कल कर, तर प्रमोदजी यांच्यासारखं भाषण करून बघ, कधी गोपीनाथजींसारखं जनतेला भावेल असं भाषण करून बघ अशा विविध गोष्टी देवेंद्रजी सहज करायचे. त्यातूनच त्यांची एक वक्तृत्व शैली निर्माण झाली.

स्वभाव लहानपणापासूनच दिलखुलास व मिश्‍कील असल्यामुळे ते सहज लोकांमध्ये वावरत असत. त्यातच रा. स्व. संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे संस्कार असल्यामुळे कधीही विचलित न होणारी एक क्षमता त्यांच्यात निर्माण झाली. 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत पश्‍चिम नागपूरमधून देवेंद्रला उमेदवारी मिळाली आणि तत्कालिन मंत्री अशोक धवड यांना पराभूत करून ते निवडून आले. दुर्दैवाने तेव्हा युतीची सत्ता गेली व विरोधी पक्षात बसायची वेळ आली. 2004 साली परत एकदा पश्‍चिम नागपूरमधून त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचा पराभव केला. पण, या वेळेस सुद्धा युतीची सत्ता न आल्याने विरोधी पक्षात बसावे लागले. यामध्ये अनेक प्रश्‍न धसास लावले व सत्ताधाऱ्यांना नामोहरम केले. तोपर्यंत टीव्ही चॅनेल्सच्या अनेक चर्चेमधून देवेंद्रजी भाजपची भूमिका परखडपणे मांडू लागले व महाराष्ट्रातल्या लोकांना एका जाणत्या नेत्याची ओळख झाली.

फेब्रुवारी 2013 देवेंद्रजींची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. खरेतर त्या वेळेस बरीच नाव होती, पण हे आव्हान पेलण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी देवेंद्रजींची निवड केली. याच काळात त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. गावोगावी गेले. चांदा ते बांदा असा महाराष्ट्र ढवळून काढला. तत्कालिन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरुद्ध रान पेटवले. 2014च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात युतीचे 43 खासदार निवडून आले. भाजपने लढवलेल्या 25 पैकी 24 जागा निवडून आल्या. देवेंद्रच्या नेतृत्वाचा एक चांगला ठसा महाराष्ट्रावर पडला. नंतरचे राजकारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. युती तुटली आणि सर्वच पक्ष वेगवेगळे लढले. भाजपला 123 जागा मिळाल्या. जवळजवळ वीस वर्षांनी महाराष्ट्रातल्या कुठल्यातरी राजकीय पक्षाला शंभरपेक्षा जागा निवडून आणण्यात यश आले होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री म्हणून श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची निवड केली.

मराठाबहुल महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणे हे वेगळ्या राजकारणाची दिशा ठरवणार होते. एक तरुण मुख्यमंत्री एक वेगळी “व्हिजन’ असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला. पण, एखादा माणूस यशस्वी होतो आहे, म्हटल्यानंतर सहाजिकच विरोधकांना ते जड जाऊ लागले. प्रत्येक वेळेस एक अदृश्‍य भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, की आता देवेंद्रजी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होतील. परंतु अतिशय निष्ठेने अतिशय तत्परतेने, अतिशय अभ्यासपूर्ण कार्य करत महाराष्ट्राला देवेंद्रजी यांनी मराठा आरक्षण मिळवून दिले. पण, मला माहिती असलेला देवेंद्र नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वागला प्रत्येक गोष्टीला धीराने आणि हसतमुखाने सामोरे गेला. कधीही देवेंद्र फडणवीस त्यांचा चेहरा पडला आहे, कोणावर चिडलेले आहेत, किंवा अतिरंजित वाक्‍य त्यांच्या तोंडून आली आहे, असे कधीच झाले नाही. स्वतः हसतमुखाने स्वपक्षीय असो किंवा विरोधक असो प्रत्येक आमदाराची कामे त्यांनी केली.

देवेंद्रजींची राजकारण करायची पद्धत सर्वसमावेशक आहे. सर्व लोकांशी संवाद ठेवणे, येणाऱ्याच्या समस्येला जास्तीत जास्त सकारात्मकतेने “सोल्युशन’ देणे हा एक त्याच्या स्वभावातला उपजत गुण आहे. अतिशय चांगले संवाद कौशल्य, रात्री दोन-अडीच, तीन वाजतासुद्धा लोकांच्या एसएमएसला उत्तर देणे, त्याच्यावर उचित कार्यवाही करणे याबद्दल ते प्रसिद्ध आहेत. एक सहज म्हणून मलाही समजा काही काम असेल, तर मी जर एसएमएस पाठवला, तर रात्री दोन-अडीचला उत्तर हे येतच होते. अनेकांना याचा अनुभव आला आहे.

यात सगळ्यांत महत्त्वाचे काम त्यांनी केले, ते म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष. पूर्वीही महाराष्ट्रात हा कक्ष होता. परंतु तो प्रभावीपणे काम करत नव्हता. या वैद्यकीय कक्षामध्ये गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांत जेवढे काम झाले नाही, ते मागच्या पाच वर्षांत झाले. अनेक गरजूंना या सहाय्यता निधीतून सहजता झाली. याची प्रचिती लोकांच्या आशीर्वादामधून कायम येत गेली. खूप महत्त्वाचे काम या कक्षातून झाले आणि वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा चेहरामोहराच बदलून गेला आणि लोकांच्या अपेक्षा खूप वाढून गेल्या.

एवढं सगळं असतानाही देवेंद्रजींनी परिवार व मित्र जणांना कायम वेळ दिला. कदाचित आमच्यासारख्या घरच्यांना ते खूप वेळ देऊ शकले नसतील, परंतु घरच्या सर्व कार्यक्रमांमध्ये मंगलप्रसंगी, दुःखद प्रसंगी ते कायम हजर राहिले. कधीही कुठल्याही नातेवाईकाला त्यांनी राजकीय पद किंवा फायदा करून दिला नाही. परिवारातला देवेंद्र हा एकदम वेगळा आणि आधी सांगितल्याप्रमाणे जिंदादिल, दिलदार असा आहे. खूप चारोळ्या त्यांना सुचतात. खूप गाणी त्यांना पाठ आहेत. अनेक किस्से त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे जेव्हा हा माणूस परिवारात असतो, तेव्हा कधीच कोणाला वाटू शकत नाही, की हा एका राज्याचा मुख्यमंत्री राहिला आहे.

2019 च्या सत्तासंघर्षाचा सर्वच गोष्टी आपण “याची देही याची डोळा’ सर्वांनी पहिल्या आहेत. “मी पुन्हा येईन’ची खिल्ली उडवली गेली. परंतु अतिशय दिलदारपणे त्यांनी ती टीका सहन केली. खरं तर सामान्य जनतेने त्यांना परत आणले होते, पण नियतीचे फासे उलटे पडले. परंतु गेले काही महिने विरोधी पक्ष नेता म्हणून आपण त्यांना बघत आहोत. या करोनाच्या संकटामध्ये ते स्वत: सर्व ठिकाणी लक्ष देऊन आहेत. वेळोवेळी सरकारला आपल्या अनुभवाच्या माध्यमातून सूचना करत आहेत. पायाला भिंगरी लागल्यासारखे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत.

महाराष्ट्राला व देशाला अशा तरुण सक्षम नेत्यांची खूप आवश्‍यकता आहे. अशा धोरणी आणि माझे ज्येष्ठ बंधू असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… आपले योगदान भारत मातेच्या चरणी अर्पण होवो, हीच सदिच्छा.

– प्रसेनजीत फडणवीस, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.