विकास डिगेची क्रिएटिव्हीटी झळकली देशभर
कोल्हापूर – कोल्हापूर शहराला कलेचे माहेरघर असेही म्हटले जाते. याची प्रचिती वारंवार येतच राहते. अशाच एक कोल्हापूरच्या हरहुन्नरी कलाकाराची कलाकृती देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला दाखवली. “जनता कर्फ्यू’ जाहीर केल्यानंतर या निर्णयाला समर्थन देण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या क्रिएटिव्हीटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्याने करोना विषाणूचे चित्र वापरून “कोईभी रोडपे ना आये’ असे सूचक आणि प्रभावी डिझाईन बनवले होते.
“जनता कर्फ्यू’च्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी, दि. 22 रोजी त्याने हे त्याच्या फेसबुकवरून शेअर केले होते. या इतक्याप्रभावी क्रिएटिव्हीटीच्या भुरळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पडली. त्यांनी देशाला संबोधित करताना विकास याची क्रिएटिव्हीटी संपूर्ण देशाला दाखवली. त्यात त्यांनी समाजमाध्यमातून अशा प्रकारे जागृती करणाऱ्यांचा विशेष उल्लेख करत त्यांचे आभारदेखील मानले. विकास डिगे याची लक्ष्मीपुरी परिसरामध्ये ऍड टुमारो ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे.
या छोट्याशा क्रिएटिव्हची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान घेतील अशे स्वप्नातदेखील वाटले नाही. मात्र, 21 तारखेला हे क्रिएटिव्ह पोस्ट केल्यानंतर अनेकांनी हे क्रिएटिव्ह शेअर केले. तसेच स्वतः डीपी देखील लावले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे समाधान वाटले. मात्र, खुद्द देशाच्या पंतप्रधानांच्या हाती माझे क्रिएटिव्ह बघून सर्व स्वप्नवत वाटलं, अशी प्रतिक्रिया विकास डिगे यांनी व्यक्त केली.