उपमहापौर मुख्यसभेला येणार सायकलवरून

पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प

पुणे – वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर सरस्वती शेंडगे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मुख्यसभेसाठी सायकलवरून प्रवास करून येणार आहेत. येत्या सोमवारी या संकल्पास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शेंडगे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

उपमहापौर शेंडगे म्हणाल्या, शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रदूषण वाढले आहे. लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली तरी ते प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे आधी आपण कृती करूनच मग त्यांना आवाहन करणार आहोत. त्यासाठी हा संकल्प राबविणार आहे.

सुमारे 20 वर्षांपूर्वी नगरसेविका असताना, सध्याच्या विद्यमान आमदार मुक्‍ता टिळक, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आम्ही महापालिकेत एक दिवस सायकलवर येत होतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे या पुढे महिन्यातून एक दिवस आपण हा उपक्रम राबविणार असल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.