पिंपरी, दि. 2 – नव्याने विकसित होत असलेल्या ताथवडेकरांना अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ताथवडेकरांच्या समस्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाचे युवा नेते चेतन पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले. फडणवीस यांनी पवार यांच्याकडून समस्या समजून घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
ताथवडेकरांच्या प्रश्नासाठी भाजपाचे युवा नेते चेतन पवार यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नुकतीच भेट घेत निवेदन दिले. पिंपरी महापालिकेत सन 2009 मध्ये ताथवडे गावचा समावेश करण्यात आला. महापालिकेत समावेश झाल्यानंतर या भागातील नागरीकरण झपाट्याने होत असताना समस्या “जैसे थे” आहेत. ताथवडे गावठाण येथील सर्वे क्रमांक 174/75 मध्ये एक धार्मिक स्थळ आहे. ताथवडेकरांसह पंचक्रोशीतील नागरिकांची येथे मोठी श्रद्धा असून याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र, या धार्मिक स्थळशेजारील जागा अंत्यविधीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. हा भाग रहिवासी क्षेत्र आहे. बाजूलाच शाळा, क्रीडांगण आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मृतावर अंत्यसंस्कार करणे संयुक्तिक ठरणार नाही. ताथवडे परिसरात अन्य ठिकाणी मुबलक जागा उपलब्ध असून हे आरक्षण स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांची असून याचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी पवार यांनी केली.
विद्यार्थी सुविधांपासून वंचित
ताथवडे येथील जिल्हा परिषदेचे शाळेचे अद्याप हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी महापालिकेच्या हद्दीत राहत असूनही त्यांना महापालिकेच्या सुविधा मिळत नाही. येथील शाळेचे हस्तांतरण करण्यासाठी यापूर्वी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यावर तोडगा निघत नसल्याने चेतन पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्यासाठी विनंती केली.