मांजरी महापालिकेत समावेश होऊन 11 गावांना सहा तर 23 गावांना दोन वर्षे पूर्ण होत आलेली असताना या गावांना लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष, रखडलेली विकासकामे यामुळे या गावांतील नागरिकांत नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या गावांच्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे.
महापालिकेत समाविष्ट गावांचे नागरीकरण वेगाने होत आहे. ग्रामपंचायत असताना पाणी. ड्रेनेज, आरोग्य, दिवाबत्ती, रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध होत होत्या परंतु, पालिकेत समावेशानंतर या सुविधा मिळत नाहीत. देखभाल दुरूस्तीही पालिकेकडून होत नाही. पथदिवे, आरोग्य यंत्रणा, प्राथमिक शाळा यांना अवकळा आली आहे. वाहतुकीचे नियोजन नाही. कर घेऊनही सुविधा मिळत नाहीत. समस्या सोडविण्याबाबत पालिकेचे अधिकारी गंभीर नाहीत, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असे शेवळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
राहुल शेवाळे म्हणाले की, 2017 मध्ये लोहगाव, साडेसतरानळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री या गावांचा तर 2021 मध्ये म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नऱ्हे, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली या गावांचा पालिकेत समावेश झाला. या सर्व गावांचा विकास आराखडा झालेला नाही. त्यामुळे मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, या गावांना आवश्यक सुविधा पुरविणे गरजेचे आहे. याबाबत त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मिळकतकर…
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतून मिळकतकर वसुली करताना ती पाच वर्षांच्या नियमानुसार टप्याटप्याने वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सुविधा मिळत नसताना वाढीव मिळकत कर भरण्याची मानसिकता नागरिकांची नसल्याचेही राहुल शेवाळे यांनी निदर्शनास आणून दिले.
समाविष्ट गावांच्या मूलभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य याबाबींना त्यामध्ये प्राधान्य दिले गेले आहे. घनकचरा व्यवस्थापन चांगल्याप्रकारे चालू आहे. सध्या निर्माण होत असलेले प्रश्न क्षेत्रीय अधिकारी पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका