देवगड येथील दिंडीचे पंढरीकडे उत्साहात प्रस्थान

ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने देवगडनगरी दुमदुमली ः वरुणराजाचीही हजेरी

नेवासाफाटा -महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या नेवासा तालुक्‍यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे रविवारी (दि.23) सकाळी 9 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी दिगंबरा… दिगंबरा…श्रीपाद… वल्लभ… दिगंबरा, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली होती.

या दिंडीचे भाविकांनी तोफांची सलामी देत उत्स्फूर्त स्वागत केले. दिंडीच्या स्वागतासाठी वरुणराजाच्या रूपाने पांडुरंग ही बरसल्याने येथील वातावरण मंगलमय व विठ्ठलमय बनले होते. पंढरीची वारी ही मनुष्य जीवनाला दिशा प्राप्त करून देणारी असल्याने भक्तीच्या संगम वारीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतो असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.

श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठ संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या यांच्या नेतृत्वाखाली दिंडींचे प्रस्थान झाले. प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रय, पंचमुखी सिद्धेश्वर श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख, सभापती कल्पना पंडित, माजी सभापती काशीनाथ नवले, विश्व हिंदू परिषदेचे अँड. सुनील चावरे, सरपंच अजय साबळे, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, प्रवरासंगमचे सरपंच सुनील बाकलीवाल यांच्या हस्ते भास्करगिरी बाबांचे स्वागत करण्यात येऊन पालखीचे पूजन करण्यात आले.

यावेळी निघालेल्या दिंडीच्या अग्रभागी नृत्य करणारे घोडे, स्वागत करण्यासाठी आलेले देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याचे झांज पथक, त्यामागे बॅंण्डपथक, ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत चाललेले झेंडेकरी, भजनी मंडळाचे पथक त्यामागे दिंडीत सहभागी वारकरी भाविक, डोक्‍यावर तुळसी कलश घेत नामस्मरण करणाऱ्या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते.

या दिंडीचे मुरमे गावात आगमन झाल्यावर सरपंच अजय साबळे तसेच संत सेवेकरी रामकृष्ण पाटील मुरदारे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच बकुपिंपळगाव येथे दिंडीचे स्वागत करण्यात येऊन दिंडीला दुपारच्या सत्रातील भोजन देण्यात आले. देवगडफाटा येथे परिसरातील भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले, तर खडका येथे दिंडीचा मुक्काम प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने भोजन देण्यात आले.

यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले, दिंडीच्या आगमनाच्या निमित्ताने पाऊस पडला. त्यामुळे वातावरण प्रसन्न झाले आहे. भरपूर असा पाऊस राज्यात व देशात होऊ दे बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना आम्ही पांडुरंग परमात्म्याला करतो. दिंडीच्या वाटेवर नगर ते टेंभुर्णी रस्ता अरुंद असल्याने वारकरी बांधवांना चालतांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी सरकारने याकामी लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.