जेजुरी -शहर व परिसरात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले असून गेल्या दोन महिन्यांपासून खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसत आहे. तसेच शहरात गोचीड तापाचे रुग्णही आढळून येत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात आजाराच्या थैमानामुळे नागरिक हैराण झालेले असून स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने संयुक्तपणे स्वच्छता यंत्रणा राबवून धुरळणी-फवारणी यंत्रणा कार्यान्वित करून जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.
रुग्णाला सुरुवातीला ताप, हातापायांना गोळे येणे, प्रचंड अशक्तपणा वाटणे, त्यानंतर, खोकला, सर्दी, कफ असे प्रकार सुरू होतात. खासगी रुग्णालयात तपासणी करून किमान तीन ते पाच दिवस यावर उपचार घ्यावे लागतात. या आजारात रुग्णाच्या प्लेटलेट्स कमी झालेल्या असतात. अशा प्रकारचे मागील दोन महिन्यांपासून किमान दोनशेहुन अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
सध्या खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण डेंग्यू सदृश्य आजारावर उपचार घेत आहेत. याची माहिती जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नसल्यामुळे रुग्णांची नेमकी संख्या सांगता येत नाही. पावसाळा सुरू झाला की जेजुरी शहर व परिसरात हा आजार बळावत असल्याचे मागील काळातील आढावा घेता दिसून येत आहे. नागरिकांनी या बाबत दक्षता घेणे गरजेचे असून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे गरजेचे आहे. घरातील पाणी साठविण्याची भांडी मोकळी करावीत व स्वच्छ कोरडी झाल्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे.