“ताडोबा’तील वाघिणीची शिकारप्रकरणी निलंबनाची मागणी

पुणे – ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फासात अडकल्याने दोन वर्षाच्या वाघिणीचा मृत्यु झाल्या प्रकरणाचा “इंडिया ग्रीन्स पार्टी’ तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संरक्षणात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी संबंधितांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली आहे.

क्षेत्रात दिवसरात्र जागता पहारा असताना दोन दिवस एवढी मोठी गोष्ट कोणाच्या लक्षात येऊ नये ही बाब या प्रकल्पाच्या व्यवस्थापनेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. याशिवाय महाराष्ट्रात वाघ सुरक्षित आहेत आणि त्यांची संख्या वाढते आहे असे सातत्याने सांगणाऱ्या सरकारच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब करणारी आहे, असे पार्टीचे म्हणणे आहे.

अशा प्रकरणात कनिष्ठांवर जबाबदारी निश्‍चित करून वरिष्ठ अधिकारी नामानिरळे राहतात. त्यामुळे या प्रकरणात प्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रधान वन संरक्षक यांच्याकडे केल्याचे पार्टीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे, मुख्यवनसंरक्षक तथा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

व्याघ्रप्रकल्पातील अधिकाऱ्यांचे लक्ष व्याघ्र पर्यटनातून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या आर्थिक प्राप्तीवर केंद्रीत झाल्याने या प्रकल्पाचे संरक्षण आणि व्यवस्थापन याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय भारतीय सेवेतील अधिकारी वातानुकुलित कार्यालयात बसून केवळ कागदी घोडे नाचवण्यात आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करण्यात वेळेचा अपव्यय करत असतात. त्यामुळे या प्रकल्प क्षेत्रात फिरती करण्यासाठी त्यांना वेळ आणि रस नसल्याचे निदर्शनाला आले आहे, आणि नेमकी हीच गोष्ट वाघांच्या मुळावर आली आहे असे “इंडिया ग्रीन्स पार्टी’चे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.