पुणे – दिल्लीहून अचानक आलेल्या “नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) च्या पथकामुळे महापालिका आरोग्य विभागाची भंबेरी उडवली. नियोजित पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची तयारी पाहण्यासाठी हे दोन सदस्यीय पथक बुधवारी आले.
या पथकाने प्रथम डॉ. नायडू रुग्णालयात जेथे हे वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे, त्याची अचानकच पाहणी केली आणि त्यावेळी आरोग्य विभागाला हे पथक आल्याची माहिती मिळाली. कोणतीही पूर्वसूचना न देता आलेल्या या पथकामुळे आरोग्य विभागाची पळापळ झाली. त्यांनी त्वरित धाव घेत कमला नेहरू रुग्णालय गाठले, जेथे महाविद्यालयासाठी बेस तयार करण्यात आला आहे.
या पथकामध्ये डॉ. हनुमंत प्रसाद आणि डॉ. सुभाष चिमकोडे या दोघांचे हे पथक आहे. त्यांनी कमला नेहरू रुग्णालयातील सगळ्या वॉर्डची पाहणी केली. याशिवाय शेजारी असलेल्या कै. बाबुराव सणस शाळेतील हॉस्टेल, हॉल आणि तिन्ही विभाग आणि अन्य व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली. गुरूवारी सकाळी या पथकाकडून नियुक्त प्राध्यापक डॉक्टर, कर्मचारी, स्टाफ, महापालिकेतील समन्वयक किती याची माहिती घेतली जाणार आहे. आजपर्यंत व्यवस्थापनासाठी ज्या लोकांची नियुक्ती केली आहे, त्याची माहिती या पथकाने मागवली असून, ती तयार करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
या पथकाबरोबर महापलिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. आशिष बंगीनवार आदी उपस्थित होते.