नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुंडांनी घडवलेल्या हिंसाचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला असून दिल्ली पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाची चौकशी करणार आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला.
जेएनयुमध्ये गुंडांनी केलेल्या हल्ल्यात अनेक आंदोलक विद्यार्थी जखमी झाले होते. त्या विरोधात देशभर निदर्शने होत आहेत. या हल्ल्यानंतर झालेल्या गोंधळात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेषा घोष यांच्यासह अनेक जण जखमी झाले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गुंडांनी हा हल्ला घडवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात अभाविप आणि जेएनयु विद्यार्थी संघटना यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
या घटनेच्या विरोधात दिल्ली पोलिस मुख्यालय, गेट वे ऑफ इंडिया आणि अलिगढ मुस्लीम विद्यापीठात या निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांन दिल्ली पोलिस आयुक्तांशी याबाबत चर्चा करून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. जेएनयु टिचर्स असोसिएशनची बैठक सुरू असताना रविवारी हा हल्ला घडला. स्वराज पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांना जमीनीवर पाडून पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली. हा हिंसाचार सुमारे दोन तास सुरू होता.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलीवाल यांनी जेएनयु विद्यापीठात विद्यार्थीनींना झालेल्या मारहाणी बद्दल दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. मनुष्यबळ विकास खात्याच्या सचिवांनी विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांसोबत चर्चा केली.
एआयएमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, या हिंसाचाराचा मी निषेध करतो. सत्तेत असणाऱ्यांनी हल्ला करणाऱ्यांना ग्रीन सिग्नल दिला असावा, यात काहीही संशय नाही. भेकडासारखे त्यांनी चेहरे झाकले होते. त्यांना सळ्या आणि लाठ्या घेऊन विद्यापीठात प्रवेशच कसा करू दिला. सर्वात वाईट म्हणजे, पोलिस या गुंडाना सुरक्षितपणे जाऊ देत आहेत. याचा व्हिडिओ आहे.
हैदराबाद मधील प्रोग्रसिव्ह डेमोक्रॅटिक स्टुडंटस् युनियनने उस्मानाबाद विद्यापीठात जेएनयु हल्ल्याचा निषेध केला. पुण्यातील फिल्म आणि टेलिव्हजन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री निदर्शने केली. त्यांनी पुण्यात मशाल फेरी काढत या गुंडगिरीविरोधात घोषणा दिल्या. बंगळुरूमध्ये टाऊन हॉल पुढे या हिंसाचारविरोधात निदर्शने केली.