पुणे – केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारतर्फे स्वास्थ योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत पुणे शहरात गेल्या वर्षभरात 1 लाख 51 हजार 452 स्वास्थ्य कार्ड वितरित झाली आहेत. याद्वारे कर्मचाऱ्यांना मोफत औषधोपचाराची सोय होत आहे.
केंद्र सरकारच्या सेवेतील तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वास्थ्य कार्ड काढून घ्यावेत, असे आवाहन देखील सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम (सीजीएचएस)तर्फे केले आहे.
सीजीएचएसचा मुकुंदनगर येथे दवाखाना आहे. या ठिकाणी दररोज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपचारासंबंधिची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. सीजीएचएस पुणेचे असिस्टंट डायरेक्टर डॉ. उदय केळकर यांनी ही माहिती दिली. पुण्यामध्ये सीजीएचएसचे आकुर्डी, येरवडा, मंगळवार पेठ, रेंज हिल्स, मुकुंदनगर, बाजीराव रस्ता, पुणे कॅम्प, पुना कॉलेजजवळ, विद्यापीठ रस्ता येथे हे दवाखाने आहेत. रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, त्वचाविकार तज्ज्ञ यांचीही व्यवस्था असून, स्पेशल डेंटल युनिटही आहे.