Delhi – दिल्लीतील पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा पुढील ५ दिवस बंद राहणार आहेत. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी ही माहिती दिली आहे. हिवाळी सुट्टीनंतर दिल्लीत सर्व सरकारी आणि खासगी शाळा सुरू होणार आहेत.
मात्र राजधानीत थंडी आणि थंडीची लाट पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार पाचवीपर्यंतच्या शाळा बंद राहतील, बाकीच्या शाळा सुरू राहतील.
यापूर्वी, दिल्लीच्या शिक्षण संचालनालयाने शनिवारी रात्री राष्ट्रीय राजधानीतील शाळांमध्ये हिवाळी सुट्टी वाढवण्याचा आदेश मागे घेतला होता. आदल्या दिवशी, संचालनालयाने सांगितले होते की दिल्लीतील कडाक्याच्या थंडीमुळे शाळांमधील हिवाळी सुट्टी १० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नंतर दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने या आदेशात काही त्रुटी असल्याचे सांगितले. हिवाळी सुट्टी वाढवण्याचा आदेश चुकून जारी करण्यात आला होता. हा आदेश तात्काळ मागे घेण्यात आला असून, उद्या सकाळी त्यावर निर्णय घेतला जाईल,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.
हिवाळी सुट्या शनिवारी संपल्या असून सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार होत्या. दिल्लीत थंडीची लाट सुरू असून पुढील काही दिवस दाट धुके, हलका पाऊस आणि तापमानात घट यामुळे भारतीय हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.