दुबई – प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतरही अंबाती रायडू याने जिगरबाज फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 5 बाद 136 धावा अशी समाधानकारक मजल मारली.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत चेन्नईला फलंदाजीसाटी पाचारण केले. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर तसेच गेल्या सामन्यातील शतकवीर फलंदाज ऋतूराज गायकवाड या सामन्यात मात्र, अपयशी ठरला. त्यापूर्वी फाफ डुप्लेसीनेही निराशा केली. त्या पाठोपाठ मोईन अली व रॉबिन उथप्पा यांनाही साफ अपयश आले. यावेळी चेन्नईची 4 बाद 64 अशी बिकट स्थिती बनली होती.
अखेर रायडूने कर्णधार महेंर्दसिंह धोनीसह संघाचा डाव सावरला. या जोडीने 5 व्या गड्यासाठी 70 धावांची बागीदारी केली व संघाला सव्वाशे धावांपेक्षा जास्त मदल मारुन दिली. दरम्यान रायडूने आपले अर्धशतक पूर्ण केले. धोनीही स्थिरावल्यानंतर बाद झाल्याने त्यांना संघाचे दीडशतक फलकावर लावण्यात अपयश आले. धोनीने 27 चेंडूत 18 धावांची संथ खेळी केली. रायुडूने 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 55 धावांची खेळी केली.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नई आघाडीवर आहे. त्यांनी 15 आणि दिल्लीने 9 सामने जिंकले आहेत. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये दिल्लीने चेन्नईचा पराभव केला आहे. गेल्या मोसमात झालेल्या स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये 2 सामने खेळले गेले आणि दोन्ही वेळा दिल्लीचा संघच जिंकला आहे.
तसेच यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यातही दिल्लीने चेन्नईचा पराभव केला आहे. यंदाच्या स्पर्धेत चेन्नईचा संघ 12 सामन्यांत 9 विजयांसह पहिल्या स्थानावर आहे, तर दिल्लीनेही 12 सामन्यात 9 विजय मिळवले आहेत. मात्र, नेट रन रेट चेन्नईचा सरस असल्याने ते पहिल्या स्थानावर आले आहेत.
संक्षिप्त धावफलक – चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 5 बाद 136 धावा. (रॉबिन उथप्पा 19, महेंद्रसिंह धोनी 18, ऋतूराज गायकवाड 13, फाफ डुप्लेसी 10, अंबाती रायडू नाबाद 55, अक्सर पटेल 2-18, रवीचंद्रन अश्विन 1-20).