नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून प्रचार आटोपून घरी परतत असताना दिल्ली मॉडेल टाऊनमधील आपचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांची कार उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आमदार गंभीर जखमी झाले आहेत. तर 5 समर्थक किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी आमदाराला लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार त्रिपाठी यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर प्रचार करून परतत असताना अचानक त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि महामार्गावरून उलटली. उन्नावमधील लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर त्यांची कार पलटी झाली. घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी अपघातग्रस्तांना कारमधून जखमींना बाहेर काढले आणि पोलिसांना माहिती देऊन रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.