मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात ज्वलंत विषय बनलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह चक्रीवादळाने झालेल्या नुकसान भरपाईसंदर्भात मदत करण्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून भाजपाने पुन्हा टीकास्त्र डागले आहे. तर यातच ही बैठक सुरु असतांना राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक सुरु असतांनाच राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यात भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर भाजप नेते उपस्थितीत आहे.
या बैठकीबाबत प्रवीण दरेकर म्हणाले,’ही फक्त पक्षांतर्गत सर्वसाधारण बैठक असून त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीशी काहीही संबंध नाही.’
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकार आणि केंद्रामध्ये समन्वयानं चर्चा होत असेल तर याचं आम्हाला चांगलच वाटेल, चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,.’ असंही दरेकर म्हणाले.